24.8 C
Ratnagiri
Thursday, February 19, 2026

पानवल धरणाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात रत्नागिरीकरांना दिलासा

रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या...

बावनदी पूल वाहतुकीस खुला एका मार्गिकेवरून प्रवास

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाचे काम पूर्ण होत...

राज ठाकरे ‘नंदनवनात’, एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
HomeRajapurकशेळी पर्यटकांच्या पसंतीस; पण सुविधांची वानवा

कशेळी पर्यटकांच्या पसंतीस; पण सुविधांची वानवा

देवघळी बीचवरील सनसेट पॉईंट विकसित केलेला आहे.

समुद्राची गाज आणि वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर यामुळे कशेळी गाव पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर प्रसिद्धीस आले आहे. ‘सनसेटपॉईंट’ सह कशेळी किनाऱ्यावरून सायंकाळी समुद्रात बुडणारा सूर्य पाहणे रोमांचकारी अनुभव ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. देशीच नव्हे तर विदेशी पर्यटकांचा ओघही वाढत आहे. कशेळीतील देवघळी किनारा आणि ‘सनसेटपॉईंट’ ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’ म्हणून पुढे आला आहे. असे असतानाही तेथे स्वच्छतागृह, चेजिंगरूमसह दर्जेदार अन् रुंद रस्ते आणि पर्यटकांसाठीच्या सोयीसुविधांचा अभावच आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्षे दिले तर पर्यटनाला गती मिळेल. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या कशेळीला श्री कनाकादित्य सूर्यमंदिरामुळे धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. सुमारे आठ-नऊ वर्षांपूर्वी कशेळीच्या समुद्रकिनाऱ्याचा ग्रामपंचायतीने ग्रामीण यात्रास्थळ कार्यक्रमांतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून पर्यटनदृष्ट्या विकास केला. त्यात विविध सोयीसुविधांस सेल्फी पॉईंट विकसित केला. हाच बदल पर्यटकांना अधिक भावला. किनाऱ्यापासून थोड्या उंचावर उभारलेल्या या पॉइंटवर जाण्यासाठी पर्यटक वेळ काढून जातात. सोशल मीडियामुळे याची प्रचार व प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात झालेली आहे.

प्री-वेडिंग शूटसाठी देवघळीचे आकर्षण – कशेळी गावाला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावरील देवघळी बीच पर्यटकांच्या पसंतीला चांगलेच उतरले आहे. एका बाजूला किनाऱ्यावर समुद्राचे फेसाळत येणाऱ्या पाण्याची गाज तर दुसऱ्या बाजूला उंचच्या उंच सुळक्यासारखे डोंगर हे दृश्य मन प्रसन्न करणारे आहे. अन्य ठिकाणचे समुद्रकिनारे सपाटीवरून पाहण्याची संधी मिळते; परंतु, कशेळी येथील देवघळी बीच उंचावरून पाहण्याची संधी मिळते. प्रत्यक्षात बीचवर मुक्तपणे फिरण्याचीही संधी मिळते. चित्रपट अन् जाहिरातींच्या शूटिंगसह प्रीवेडिंगसाठी महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून देवघळी बीच दिवसागणिक अधिक नावारूपास येऊ लागले आहे.

‘सनसेट अन् सेल्फी पॉईंट’ – देवघळी बीचवरील सनसेट पॉईंट विकसित केलेला आहे. तिथे जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ताही केलेला असून, सेल्फी पॉईंटही तयार केला आहे. सूर्यास्तावेळी सेल्फी घेण्यासाठी पर्यटक येत आहेत. तेथील काळ्या दगडांवर बसून लाटांचा अनुभवही घेता येतो.

सूर्यमंदिर जागतिक अभ्यासकांचे केंद्र – भारतात सूर्यमंदिरे फारच थोडी असून, सौराष्ट्रात वेराळजवळ प्रभासपट्टण येथे प्राचीन सूर्यमंदिर आहे. उत्तरपदेश, मध्यप्रदेश, कोणार्क, नेपाळ या भागात काही ठिकाणी सूर्यमंदिरे असून, महाराष्ट्रातील कशेळी येथील एकमेव कनकादित्य सूर्यमंदिर आहे. या मंदिरातील श्री कनकादित्यची विलोभनीय मूर्ती, मंदिराचे लाकडाच्या साह्याने तयार केलेले सभामंडप आणि त्यावरील आकर्षक कोरीवकाम लक्षवेधी आहे. कशेळी येथील प्रसिद्ध कनकादित्य’ सूर्यदेवाचे मंदिर हे कोकणातील सौरपंथाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. हे महाड येथील पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक डॉ. अंजय धनावडे यांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. आडिवरे हेच ‘प्राचीन आदित्यवाड’ असल्याची महत्त्वपूर्ण बाबही त्यांच्या संशोधनातून स्पष्ट झाली असून, सुमारे १३०० वर्षापूर्वीची अखंड सूर्यउपासनेच्या परंपरेचा उलगडा या निमित्ताने झाला आहे. या अभ्यासामुळे अभ्यासकांसाठीही कशेळीचे महत्त्व वाढलेले आहे.

पर्यटनस्थळांवर सोयीसुविधांचा अभाव – कशेळी परिसरात अद्यापही पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची प्रतीक्षाच आहे. त्यात या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी दर्जेदार स्वच्छतागृहासह चेजिंगरूम नाही. मुख्य रस्त्यावरून देवघळी बीचकडे जाणाऱ्या रस्यावर सतत वाहतूक कोंडी होते. हा रस्ता रुंद करणे आवश्यक आहे. सेल्फी पॉईंटच्या येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दर्जेदार संरक्षक कठडा उभारण्याची मागणी केली जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या पायऱ्यांना समुद्राच्या एका बाजूने लोखंडी रेलिंग बसवल्यास सुरक्षितपणे सेल्फी पॉईंटवर जाता येईल. अनेकवेळा किनारपट्टीवरील पाण्याच्या खोलीचा किंवा निसरड्या वाळूची माहिती नसल्याने समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात मौजमस्तीसाठी उतरणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यासाठी सुरक्षारक्षक आणि पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसचौकीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर दर्जेदार हॉटेल्स अन् होमस्टेसारख्या सुविघांही येथे नाहीत.

किनारपट्टीवर पक्ष्यांचा किलबिलाट – कशेळीबांध परिसरातील झाडीमध्ये खाडीभागाच्या किनाऱ्यावर विविध जलचर पक्ष्यांसह देशी-विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य असते. त्यामध्ये विशेषकरून बदक आणि बगळे प्रजातीतील पक्ष्यांचा समावेश असतो. सुंदर दिसणाऱ्या पक्ष्यांच्या शांत पाण्यातील जलक्रीडा अनुभवताना, त्यांचा किलबिलाट आणि हवेतील कसरती अनुभवताना मनाला वेगळा आनंद मिळतो. त्यातच, पाण्याच्या काठावरील मोठमोठ्या झाडांवर सायंकाळी परतीच्या पक्ष्यांचे थवेही पाहण्याची संधी मिळते.

RELATED ARTICLES

Most Popular