राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे हातणकरवाडी परिसरात मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्याची चांगलीच दहशत पसरली आहे. गुरुवारी सायंकाळी सुमारे सव्वासातच्या सुमारास हि थरारक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घरातील कोंबडयांच्या वासाने चक्क गावातील एका घरामध्येच बिबट्याने एन्ट्री केल्याने सर्वांची घाबरगुंडी उडाली. दीपक साखरकर यांच्या घरात हा बिबट्या शिरला होता. त्यांच्या पत्नी धनलक्ष्मी साखरकर यांनी त्याला प्रथम पाहिले व त्या घाबरून गेल्या.
बिबट्याला पाहताच त्यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर देखील प्रसंगावधान राखत घरातील सर्वांनी स्वत:ला एका खोलीत सुरक्षितपणे बंद करून घेतले. खोलीला आतून कडी लावली आणि बिबट्याला घरातून हुसकावण्यासाठी सर्वांनी जोरात ओरडायला सुरुवात केली. शेजारी असलेल्या ग्रामस्थांनीही साखरकर यांच्या धाव घेतली, गावकऱ्यांनीही मोठ्याने आरडाओरड सुरु केल्याने बिबट्याने काही वेळातच घरातून पलायन केले. त्यामुळे साखरकर कुटुंबीयांना सुटका झाल्याचे पाहून हायसे वाटले. घरातील आणि शेजाऱ्याचा गोंधळ ऐकून बिबट्या घरातून निघून गेल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
गोठणे-दोनवडे हातणकरवाडी परिसरात गेले काही दिवस बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू आहे. चक्क भर दिवसाही ग्रामस्थांना याचे दर्शन घडत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावारण निर्माण झाले आहे. वाडीतील काही भटकी कुत्रीही या बिबट्याने फस्त केली आहेत. गुरुवारी संध्याकाळी सव्वासातच्या दरम्यान हा भक्ष शोधण्यासाठी आलेला बिबट्या दीपक साखरकर यांच्या घराच्या पडवीतील कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला होता. मात्र, साखरकर कुटुंबीयांनी वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे या परिसरात घबराट निर्माण झाली असून वनविभागाने बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तहसीलदार शितल जाव, निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी तत्काळ रवाना होण्याचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने राजापूर वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सागर गोसावी आपल्या टीमसह या ठिकाणी पोहोचले व पाहणी केली.