HomeRajapurराजापूर अर्बनची कर्जवसुली नियमाप्रमाणेच…

राजापूर अर्बनची कर्जवसुली नियमाप्रमाणेच…

बँकेकडून या कर्ज वसुलीप्रकरणी कडक व धडक कारवाई होणार आहे.

राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेतील ‘त्या’ थकीत कर्जदारांविरोधात कर्जवसुली प्रकरणी बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये रत्नागिरी सहायक निबंधक कार्यालयामार्फत सुरू केलेली कारवाई नियमाप्रमाणे व योग्यच असल्याचे बँकेचे अध्यक्ष संजय ओगले व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट कैले आहे. राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेत कर्जवितरणात अनियमितता आढळून आली आहे. सुमारे दोन कोटी सात लाखांच्या कर्जप्रकरणांत अशा प्रकारे अनियमितता व गैरप्रकार आढळून आला आहे. याबाबत यापूर्वीच बँकेने स्वतःहून खुलासा दिला आहे. या प्रकरणी बँकेकडून तत्काळ दखल घेत प्रारंभी अंतर्गत चौकशी समिती व त्यांनंतर तज्ज्ञांची चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शाखाधिकारी यांनी नियमबाह्य काम केल्याचा ठपका ठेवून त्याचे निलंबन करून त्याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केलेला आहे तर यात दोषी असणाऱ्या अन्य अधिकारी व कर्मचारी यांचीही चौकशी सुरू असून, तशी नोटीसही बजावण्यात आल्याचे ओगले व अहिरे यांनी सांगितले. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नसून, सभासदांचा विश्वास हीच बँकेची संपत्ती असून कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी नमूद केले. आतापर्यंत अशा प्रकारे थकीत असलेल्या ३१ कर्जदारांविरोधात बँकेने कर्ज वसुलीप्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये रत्नागिरी सहायक निबंधक कार्यालयामार्फत कारवाई सुरू केलेली आहे तर आणखी १८ कर्जदारांविरोधात ती प्रस्तावित असून, तीही केली जाणार आहे. बँकेने केलेली ही कारवाई योग्यच असल्याचे नमूद करताना या कर्जदार सभासदांना याबाबत काहीच माहीत नाही, हे त्यांचे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर – राजापूर अर्बन बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. त्यामुळे सेव्हिंग वा कर्जखात्यात पैसे जमा होणे, वजा होणे याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर येतो तर गृहकर्ज घेणाऱ्यांनी थेट बिल्डरच्या खाती पैसे वर्ग करण्याच्या सूचना दिलेल्या असतात व त्यांच्याच सूचनेने ते पैसे वर्ग होतात व याबाबतही संदेशही येतात. त्यामुळे अशा प्रकारे आता आम्ही कर्ज घेतलेले नाही, आम्हाला माहीत नाही अशी ओरड करून नाहक बँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले; मात्र बँकेकडून या कर्ज वसुलीप्रकरणी कडक व धडक कारवाई होणार असल्याचे ओगले यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular