HomeRatnagiriताजे मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी मिरकरवाडा मच्छीमार्केट

ताजे मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी मिरकरवाडा मच्छीमार्केट

१५ दिवस थांबलेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे.

गेले १५ दिवस अवकाळी पावसाच्या फेऱ्यात अडकलेला मासेमारी व्यवसाय कालपासून सुरू झाला. त्यामुळे ताजी फडफडीत मासळी बंदरात येऊ लागल्याने खवय्यांच्या मासळी खरेदीसाठी आज मिरकरवाडा बंदरातील मच्छीमार्केटवर उड्या पडला. बंदरामध्ये मच्छीमार्केट आणि मार्केटच्या बाहेर खवय्यांची प्रचंड गर्दी होती. सुरमई हजार रुपये, पापलेट ८०० तर सरंगा ६०० असा चढा भाव होता. त्याची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणात मासळी खरेदी झाली; परंतु अन्य मासळीऐवजी बांगडा मोठ्या प्रमाणात होता. पावसाने गेले पंधरा दिवस धुमाकूळ घातला होता. अवकाळीच्या वक्रदृष्टीमुळे जिल्ह्यातील भात, नाचणी पीक आणि आंबा, काजू फळबागांवर विपरीत परिणाम झाला. हातातोंडाला आलेले शेतकऱ्याचे पीक अवकाळीमुळे गेले. बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले. याचा मोठा फटका जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय असलेल्या मासेमारीलाही बसला.

वाऱ्यामुळे आणि वादळी परिस्थितीमुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास प्रशासनाने मनाई केली होती. त्यामुळे सुमारे साडेतीन हजारांच्या वर नौका जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये पंधरा दिवस विसावल्या होत्या. मासेमारी बंद झाल्यामुळे मार्केटमधील मासळीची आवक थांबली. परिणामी, ताजी मासळी मिळेनाशी वेळ खवय्यांवर आली. गेले काही दिवस पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे १५ दिवस थांबलेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. ताजी फडफडीत मासळी खरेदीसाठी आज मिरकरवाडा बंदरात खवय्यांनी गर्दी केली होती. रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी होती. मार्केटच्या आत आणि पाठीमागच्या बाजूला मासळी खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केली होती. विक्रेत्यांनी त्याचा फायदा घेऊन चढ्या भावानेच मासळी विक्री केली.

असे आहेत दर ! – नियमित सहाशे ते आठशे रुपये किलोला मिळणारी सुरमई हजार रुपये किलो होती. पापलेट ८००, तर सरंगा ७०० रुपये किलोने विकला जात होता. तरी खवय्यांनी दोन हजार, तीन हजारांची सुरमई, पापलेट, सरंगा खरेदी करून आपल्या जिभेचे चोचले पुरवले.

RELATED ARTICLES

Most Popular