रत्नागिरी एसटी विभागाला नऊ कोटींचे उत्पन्न

110
Nine crores income to Ratnagiri ST department

शिवसेना- भारतीय जनता पक्ष युती सरकारने राज्यात १७ मार्चपासून एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के तिकीट सवलत जाहीर केली आणि एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत भरघोस वाढ झाली. महिला सन्मान योजनेत रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता आतापर्यंत तीन महिन्यांत ४६ लाख ३६ हजार ९३ महिलांनी प्रवास केला. यातून तब्बल नऊ कोटी ३२ लाख ४६ हजार २५२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एसटीच्या महिला प्रवाशांमध्ये झालेली ही वाढ साधारण ४५ टक्के आहे. दररोज रत्नागिरी जिल्ह्यात सव्वादोन लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. यात ९० हजार महिला प्रवाशांचा समावेश आहे. यापूर्वी महिला सन्मान योजना दैनंदिन प्रवाशांची संख्या साधारण एक लाख ६५ हजार होती. यात वाढ होऊन ती सव्वादोन लाखांवर पोहोचली आहे, अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजना घोषित करून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमधील प्रवासात महिला व मुलींना तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी १७ मार्चपासून झाली. त्या दिवसापासून महिला प्रवाशांची एसटीत गर्दी वाढली आहे. आता बसमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी जास्त पाहायला मिळते. एसटीत चढ-उतारासाठी महिलांचीच गर्दी असते.

तोटा कमी होण्यास मदत  – कोरोना काळापूर्वी एसटी महामंडळ तोटा कमी होण्यास मदत प्रचंड तोट्यात होते. कोरोना कालखंडात ९० ते ९५ टक्के एसटी फेऱ्या बंद होत्या; परंतु आता महिला सन्मान योजना जाहीर केल्यावर एसटीचा तोटा कमी होऊ लागला आहे. ५० टक्के प्रवासाची रक्कम एसटीकडे जमा होत असून, उर्वरित ५० टक्के अनुदानाची रक्कम राज्य शासनाकडून एसटीला वेळोवेळी देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीचा संचित तोटा कमी होण्यास उपयोग होणार आहे.