मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणासह नव्या जगबुडी पुलावरील चौपदरीकरणाच्या कामाला ठेकाधारक कंपनीने गती दिली. नव्या जगबुडी पुलावरील दोन्ही बाजूकडील चौपदरीकरण कामासाठी हा पूल महिनाभर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दोन्ही बाजूकडील चौपदरीकरण पूर्ण झाल्याने शनिवारपासून पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहने सुसाट धावत आहेत. चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. परशुराम घाटातील चौपदरीकरण कामासाठी डोंगर पोखरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घाटातील चौपदरीकरण ठेकेधारक कंपनीसाठी एक मोठे आव्हानच बनले आहे. मात्र, तरीही घाटातील काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कंपनीचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. खवटीपासून लोटेपर्यंत चौपदरीकरणातील किरकोळ कामे प्रलंबित असून या कामांनाही गती देण्यात आली आहे.

भरणे येथील नव्या जगबुडी पुलाच्या दोन्ही बाजूकडील चौपदरीकरणाचे काम रखडले होते. मात्र, तरीही या पुलावरून वाहतूक सुरूच होती. ठेकाधारक कंपनीने २२ मार्चपासून पुलावरील चौपदरीकरणाचे काम हाती घेतले, यासाठी नवा जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.या ठिकाणचे चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कंपनीने दिवस-रात्र काम सुरू ठेवले होते. अखेर दोन्ही बाजूकडील काम पूर्ण झाल्याने पूल वाहतुकीस खुला झाला आहे. सद्यस्थितीत नवा जगबुडी पूल व लगतच्या जोड पुलावरून वाहतूक सुरू असून प्रवासही गतिमान झाला.