जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात दलालांचा सुळसुळाट आता अधिकच वाढू लागला आहे. साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी १०० रुपयांपासून १५० रुपयांची मागणी केली जात असून साधा अर्ज लिहिण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेकडून १०० रुपये उकळले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या अनधिकृत एजंटची टेबल तात्काळ काढून टाकावीत अशी मागणी करण्यात येत आहे. शाळांच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत त्यातच दहावी, बारावीचा निकाल देखील मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. नवीन शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ना ना तऱ्हेच्या दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालक जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात येत असतात मात्र सध्या या सेतू कार्यालयाला दलालांनी वेढा घातला आहे. दलालांचा सुळसुळाट या कार्यालयात वाढला असून ओळख म्हणून साक्षीदाराची सही करण्यासाठी भोळ्या भाबड्या लोकांकडून पैसे उकळण्याचा नवा व्यवसाय काही भामट्यांनी सुरु केला आहे. हे प्रकार सातत्याने वाढत असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांच्या खिशाला चाट बसत आहे.

यापूर्वी काही दलालांवर प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली होती. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यानंतर पुन्हा दलालांचा वावर सुरु झाला आहे. त्यातच अर्ज लिहून देण्याच्या नावाखाली काही स्टँपव्हेंडर्सनी कार्यालय आपल्या ताब्यातच घेतले आहे, अशी खुलेआम चर्चा सुरू आहे. या कार्यालयाबाहेर बाकडी टाकून अर्ज लिहून देण्याचा व्यवसाय काहींनी सुरु केला आहे. १०-२० रुपयांचा अर्ज ५० ते १०० रुपयांना लिहून दिला जात आहे. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून या स्टँपव्हेडर्संना वेळीच येथून हलवावे अशी मागणी होत आहे. नव्याने दाखल झालेले तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे नागरिकांसह रत्नागिरीतील पत्रकारांनीदेखील तक्रार केली. या तक्रारीची त्यांनी दखल घेतली आहे. मात्र त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई त्यांच्या कार्यालयाकडून झालेली नाही. अनधिकृतरित्या ठाण मांडून बसलेल्या आणि संपूर्ण तलाठी कार्यालयाचा दर्शनी भाग ताब्यात घेतलेल्या स्टँपव्हेंडर्सना तेथून हटवणार कधी? असा प्रश्नदेखील आता केला जात आहे.