मनसेकडून उमेदवार जाहीर केला. त्यामुळे महायुतीत बिघाडी झाल्याचे समोर येत असतानाच आता या जागेसाठी शिंदे गट देखील आग्रही असल्याचे समोर येत आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे या मतदारसंघातुन इच्छुक असल्याची माहिती मिळत असून त्यांनी कामाला देखील सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना उबाठा व काँग्रेसमध्ये देखील अद्याप या जागेवरून धुसफुस आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची व रंगतदार अवस्थेत पोहचण्याची शक्यता आहे.
ठाणे ते सिंधुदुर्ग असा ५ जिल्ह्याचा कोकण पदवीधर मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर गेले अनेक वर्षे भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत सेना भाजप येथे स्वतंत्र लढले होते. विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यासमोर शिवसेनेचे संजय मोरे यांनी मोठे आव्हान उभे करून जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे डावखरे यांचा फक्त ८ हजार मताधिक्याने विजय झाला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
ठाण्याचे वर्चस्व – ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असल्याने या निवडणुकीत ठाणे जिल्ह्याची महत्वाची भूमिका राहिली आहे. गेल्यावेळी तिन्ही उमेदवार हे ठाणे जिल्ह्यातीलच होते. अद्याप ठाकरे गटाने किंवा महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसच्या आग्रहामुळे कदाचित सावध भूमिका घेतली जात असावी. परंतु महायुती मध्ये मात्र उमेदवारीवरून ठिणगी पडली असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.
डावखरे पुन्हा ? – भाजप निरंजन डावखरे यांनाच पुन्हा उमेदवारी देणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने मात्र अभिजित पानसे यांच्या रूपाने आपला उमेदवार जाहीर करून महायुतीत बिघाडी झाल्याचे किंवा आपला पाठींबा फक्त लोकसभा निवडणुकीपुरताच होता. आता मनसे भाजप किंवा महायुती बरोबर नाही. हे जणू स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसेचे अभिजित पानसे व भाजपचे निरंजन डावखरे हे दोन उमेदवार तर निश्चित झाल्याचे दिसून येत आहे.
शिंदे गटही इच्छूक – आपण महायुतीत नाही हे मनसेने स्पष्ट केले असतानाच आता शिवसेना शिंदे गटदेखील या जागेसाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला कडवी झुंज देणारे संजय मोरे हे या मतदारसंघात इच्छुक आहेत. त्यांनी कामालादेखील सुरुवात केली असल्याचे शिंदे गटातील कार्यकर्ते सांगत आहेत. तसेच ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. आणि संजय मोरे यांना मतदारसंघाची देखील पूर्ण माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील स्वबळावर ही निवडणूक लढवणार की काय? अशी चर्चा आता ऐकण्यास मिळत आहे.
आघाडीतही चुरस – महायुतीत ठिणगी पडलेली असतानाच महाविकास आघाडीत देखील सर्वकाही आलबेल आहे असे मुळीच नाही. शिवसेना ठाकरे गटाने येथे तयारी केली असली तरी काँग्रेसने या जागेवर दावा ठोकल्याने साहजिकच येथे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण कोकणात काँग्रेसला एक ही जागा मिळालेली नव्हती. तसेच पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने आपला दावा या जागेसाठी अधिक घट्ट केला आहे, अशी माहिती मिळत आहे. जर ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला सोडली नाही तर मग काँग्रेसदेखील स्वबळावर जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे झाल्यास कोकण पदवीधर निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे.