मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी ते लांजा तालुक्यातील वाकेड या टप्प्यात सुमारे ५० हजार झाडे महामार्ग दुतर्फा लावण्याचे काम सुरू झाले आहे. ३ कोटी २२ लाख रुपये या वृक्ष लागवडीवर खर्च होणार आहेत. चौपदरीकरणाच्या कामात बावनदी ते वाकेड या दरम्यान २३ हजार झाडांची तोड करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने वृक्षप्रेमींच्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई महामार्ग हरित महामार्ग होईल, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. या महामार्गावर पुन्हा नव्याने देशी वाणाचे वृक्ष लावण्याचे आदेश दिले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई-गोवा महामार्गाचे उपअभियंता अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले, बावनदी ते वाकेड ठिकाणच्या रस्त्याच्या दुतर्फा देशी वाणाची सुमारे ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. इगल कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. या अगोदर चौपदरणीकरणाच्या कामात २३ हजार झाडांची तोड झाली आहे. वनविभागाचे सहकार्य घेऊन पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी कोकणातल्या मातीत वाढणारे वड, पिंपळ, आंबा, नीम, ताम्हण, कदंब, कांचन, आवळा, अर्जुन, आपटा, महोगनी, पिंपळ, पांढरा शेवगा, जांभूळसारख्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. वनविभगाच्या रोपवाटिकेतून एक वर्षापेक्षा जास्त वय असणारी झाडे आणण्यात आली आहेत. पर्यावरणाला धोका पोहोचू नये यासाठी रस्त्याचे काम सुरू असताना ही वृक्ष लागवड करण्यात येत आहे.
वृक्ष लागवडीचे तंत्र निश्चित केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटार सोडून एक मीटरपासून वृक्ष लागवडीस सुरुवात होईल. सात मीटर अंतरावर झाडे लावण्यात येतील. पहिल्या टप्प्यात छोट्या उंचीची, दुसऱ्या भागात मध्यम आणि तिसऱ्या टप्प्यात उंच वाढणारी झाडे असतील. चढत्या क्रमाने झाडे लावली तर ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही आणि पर्यावरणावर होणारे परिणाम टाळता येतील. झाडे मिळवण्यासाठी कंत्राटदाराने जवळच्या नर्सरीधारक किंवा वनविभागाची मदत घ्यावयाची आहे. प्रतिकिलोमीटरला ५३८ झाडे लावण्यात येणार आहेत. त्यात छोट्या उंचीची ३३३, मध्यम उंचीची १६८ आणि उंच ८४ झाडे असे गणित निश्चित केले आहे. लागवड केलेल्या झाडांची देखभाल १५ वर्षे संबंधित ठेकेदाराला करावी लागणार आहे.