चिपळूण शहरातील मटण आणि मच्छीविक्रीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेचे मटण व मच्छीमार्केट मागील १८ वर्षांपासून बंद आहे. ही इमारत सुरू करण्यास प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अपयश आले. त्यामुळे मिळेल त्या जागेत रस्त्याच्या कडेला विक्रेते ठाण मांडत आहेत. रखडलेल्या प्रकल्पांचा बाऊ करून निवडणुका जिंकल्या जातात; पण एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर त्याला अवास्तव महत्त्व न देता शांतपणे काम केले तरच तो प्रश्न सुटू शकतो. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र हे त्याचे उदाहरण आहे. तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी पुढाकार घेऊन मागील १८ वर्षे दुरुस्तीच्या कामात अडकलेले सांस्कृतिक केंद्र अखेर सुरू केले. सर्वपक्षीय नेते आणि प्रशासनाने एकत्र येऊन मटण व मच्छीमार्केटचा प्रश्न सोडवण्याची गरज होती. तसे झाले नाही. पालिकेने बांधलेली मच्छीमार्केटची इमारत बंद अवस्थेत आहे. सध्या ही इमारत मोडकळीस आली आली आहे. काही विक्रेते या इमारतीचा अनधिकृत वापर करत आहेत.
पालिकेत मागील तीन वर्षांपासून प्रशासक राजवट आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी सांगतील त्याप्रमाणे शहरातील विकासकामे झाली; परंतु पालिकेचे मटण व मच्छीमार्केट कोणालाही सुरू करता आले नाही. शहरातील भाजीमंडईचा प्रश्न जसा किचकट बनला आहे तसाच मटण व मच्छीमार्केटचा प्रश्न किचकट आहे. त्यामुळे मटण व मच्छीविक्रीची गंभीर समस्या शहरात निर्माण झाली आहे. पालिकेच्या मालकीचे मटण व मच्छीमार्केट २००७ मध्ये दुरुस्तीसाठी तोडण्यात आले. त्या वेळी आठ व्यावसायिकांना सोयीनुसार मिळेल त्या जागेत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली. मटण व मच्छीमार्केट दुरुस्तीचे काम घेतलेल्या एजन्सीने वेळेत काम केले नाही. तब्बल सात वर्षांनंतर मार्केट तयार झाले. त्यातील ४३ गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पालिकेने राबवली. त्या वेळी विक्रेत्यांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरवली. तेव्हापासून अजूनपर्यंत विक्रेते आणि पालिका यांच्यामध्ये समन्वय साधून मटण व मच्छीमार्केट सुरू करण्यासाठी कोणी प्रयत्न केले नाही. त्यामुळे पालिकेचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडाला आहे.
विक्रीनंतर कचरा जागेवरच – चिपळूण शहरात विक्रेत्यांची संख्या ५० हून अधिक झाली आहे. बाहेरून येऊन व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रस्त्याच्या कडेला मच्छीविक्री केल्यानंतर विक्रेते कचरा तिथेच फेकून निघून जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. काही विक्रेते वाशिष्ठी नदीत कचरा फेकून नदी प्रदूषित करतात. पालिकेने कारवाई केली तरी पुन्हा त्याच जागेवर बसून विक्रेते व्यवसाय करतात. काविळतळी बांदल हायस्कूल, कोलेखाजण, गोवळकोट रोड, बहादूरशेख नाका या ठिकाणी विक्रेते व्यवसाय करतात.